रत्नागिरी:- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार ऑगस्टपासून बंद आहे. त्यामुळे शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नाही. राज्यस्तरावरील पोषण आहार पुरवठादार निश्चित होत नसल्यामुळे विद्यार्थी वंचित राहीले आहेत.
मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवला जातो. कोरोना काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना तांदूळ, डाळी व इतर वस्तू एकत्रितपणे पुरवल्या जात होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकही सुट्टीवर असल्यामुळे त्या काळातील पोषण आहाराची रक्कम विद्याथ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी त्याने बँक खाते उघडण्याचे आदेश दिले होते. त्याबाबतही गेल्या चार महिन्यांपासून घोळ सुरू आहे. त्यातच आधीच्या पुरवठादाराच्या कंत्राटाची मुदत संपल्यामुळे ऑगस्टपासून शिक्षण विभागाला होणारा पोषण आहार पुरवठा ठप्प आहे. यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. सध्या जिल्ह्यात पहिलीपासूनचे वर्ग नियमितपणे सुरू आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नाही.
पोषण आहार पुरवण्यासाठी राज्यस्तरीय पुरवठादार निश्चित केला जातो. याबाबतच्या निविदाही राज्यस्तरावरून असतात. मात्र, राज्य सरकारने आधीच्या पुरवठादाराची मुदत ऑगस्टमध्ये संपणार असूनही नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण केली नाही. यामुळे मुदतीत पुरवठादार निश्चित झालेला नाही. परिणामी पोषण आहाराचा पुरवठा होत नसल्यानपोषण आहार ठप्प आहे.