Monday, August 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी पर्ससीन मच्छीमारांकडून राज्याचा नियम धाब्यावर

पर्ससीन मच्छीमारांकडून राज्याचा नियम धाब्यावर

12 नॉटीकलच्या आत मासेमारी, शाश्वत मच्छीमार संघटनेचा आरोप

रत्नागिरी:- राज्याच्या सागरी क्षेत्राबाहेर म्हणजेच १२ नॉटीकल मैलबाहेरच्या समुद्रात मासेमारी करण्याचा एक्सेस परवाना असलेल्या पर्ससीन नेट नौका १२ नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करू लागल्या आहेत. शाश्वत मच्छिमार हक्क संघाने यासंदर्भात अशी मासेमारी करणाऱ्या नौकांचे किनाऱ्यावरून छायाचित्र घेवून सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना अवगत केले असल्याचे शाश्वत संघाचे नेते छोटू भाटकर यांनी सांगितले.

पर्ससीन नेट मासेमारी करणाऱ्या नौकाना राज्य शासनाच्या अखत्यारितील समुद्र क्षेत्रात किंवा १२ नॉटीकल मैलच्या आत मासेमारी करण्याची परवानगी नाही. पर्ससीन नेट नौकाना केंद्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील म्हणजेच १२ नॉटीकल मैलबाहेर खोल समुद्रात मासेमारी करण्याचे एक्सेस परवाने देण्यात आले आहेत. सुमारे ३०५ एक्सेस पास देण्यात आले असून या नौकाना १ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी मिळाली.
पर्ससीन नेट मासेमारी दरवर्षी १ सप्टेंबरपासूनच सुरू होते. नौकेवर काम करणाऱ्या खलाशांच्या उपलब्धतेनंतर आणि नौकांची डागडूजी झाल्यानंतर ७ ते ८ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरू होते. परंतु यंदा १४ ऑगस्टचा मुहुर्त सादर काही नौका समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या. परंतु या नौका १२ नॉटीकल मैल अंतराच्या पुढे न जाता राज्याच्या समुद्रातच मासेमारी करत असल्याचे दिसून आले. किनाऱ्यावरून अशा नौकांचे छायाचित्र काढून त्यासंदर्भात सहाय्यक मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून कारवाई करण्याची विनंती करण्यात आली असल्याचे शाश्वत मच्छिमार हक्क संघाचे नेते छाटू भाटकर यांनी सांगितले.