परदेशातून आलेल्यांमध्ये आणखी 28 जणांची भर; आतापर्यंत 74 जण जिल्ह्यात दाखल

रत्नागिरी:-  दुबई, ओमान, कुवेतसह अन्य देशांमधून आलेल्यांमध्ये 28 जणांची भर पडली आहे. परेदशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची एकुण संख्या 74 वर पोचली आहे. ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सुरक्षेसाठी संबंधितांची आठ दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ओमीक्रॉनचा भारतामध्ये शिरकाव झाल्यानंतर राज्य शासनाकडून सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परदेशामधून आलेल्यांची यादी विमानतळावरुन जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्यात आली होती. गुरुवारी (ता. 2) आलेल्या यादीमध्ये 46 जणांचा समावेश होता. आज त्यात भर पडली असून आणखीन काही परदेशी लोकं गावाकडे परत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार पहिल्या टप्प्यात प्राप्त यादीतील सर्वांशी संपर्क झाला आहे. त्यांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी झाली असून अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही लक्षणे नसल्याने सध्या त्यांना घरीच राहण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यांच्यावर आठ दिवस आरोग्य यंत्रणेचे लक्ष राहणार आहे. आठ दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांना बाहेर फिरण्यास मोकळीक दिली जाणार आहे. जिल्ह्यात आलेल्यांपैकी सर्वाधिक रत्नागिरी तालुक्यातील आहेत. शुक्रवारी प्राप्त यादीनुसार दापोली 6, खेड 8, चिपळूण 5, संगमेश्‍वर 1, रत्नागिरी 8 जणांचा समावेश आहे.