गळती थांबविणे शक्य नसल्याने निर्णय
लांजा:- पन्हळे धरणाला लागलेली गळती थांबविणे सध्या तरी शक्य नसल्याने धरणातील पाणी साठा कमी करणे हाच त्यावरील उपाय असल्याने याबाबत संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
लांजा तालुक्यातील पन्हळे येथील लघुपाटबंधारे विभागाच्या धरणाच्या सांडव्याला सोमवारपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली असून त्यामुळे पान्हळे धरण क्षेत्राखाली असलेल्या पाच ते सहा गावांमध्ये धरण फुटीच्या भीतीने घबराट निर्माण झाली होती. मंगळवारी याबाबत लांजा तहसीलदार पोपट ओमासे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता एस.व्ही. नलावडे, कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे, पंचायत समिती सदस्य अनिल कसबले यांनी संयुक्तपणे पाहणी केली होती. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी धारणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी दुपारी ३.३० वाजता पन्हळे धरणाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती घेतली. सूचना दिल्या आहेत. स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सद्यस्थितीत काय उपाययोजना करता येईल याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने धरणाला लागलेली गळती थांबविणे सध्या तरी अशक्य असल्याने धरणातील पाणी साठा कमी करणे हा एकमेव उपाय असल्याने याबाबत अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना खासदार विनायक राऊत यांनी दिल्या आहेत.
या भेटीप्रसंगी खासदार विनायक राऊत यांच्या समवेत शिवसेना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, उद्योजक किरण सामंत, तालुकाप्रमुख संदीप दळवी, लघुपाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, उपअभियंता एस.व्ही. नलावडे, कनिष्ठ अभियंता मंगेश शिंदे, लांजाचे तहसीलदार पोपट ओमासे, निवासी नायब तहसीलदार उज्वला केळुसकर, लांजा सभापती लीला घडशी, उपसभापती दीपाली दळवी -साळवी, जि.प. सदस्य स्वरूपा साळवी, चंद्रकांत मणचेकर, पं. स.सदस्य अनिल कसबले, गटविकास अधिकारी यशवंत भांड, लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, पाणी समिती सभापती राजू हळदणकर, नगरसेवक सचिन डोंगरकर, सुनील कुरुप, स्वरूप गुरव, गणेश लाखण, पन्हळे गावचे माजी उपसरपंच तुकाराम मसणे, ग्रा.पं. सदस्य विकास कांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष हरीश्चंन्द्र गुरव, प्रदीप मसणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.