पती – पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत 105 शिक्षकांच्या बदल्या

रत्नागिरी:- आधीचे दोन वर्षे करोना आणि त्यानंतर मागील वर्षी बदल्यांसाठीचे ऑनलाईन सॉफ्टवेअर निर्मिती यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना तीन वर्षापासून मुहूर्त मिळाला नव्हता. मात्र, 30 डिसेंबरपासून गुरुजींच्या बदल्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. यात संवर्ग एक मधील 241 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून शुक्रवार 6 जानेवारी रोजी 106 शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रिकरण (संवर्ग दोन) साठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 105 जणांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या आहेत.

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. अडथळ्यांची शर्यत पार करत ही पक्रिया सुरु आहे. संवर्ग एकमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून यात 241 प्राथमिक शिक्षकांची सोय झालेली आहे.
सोमवारी संवर्ग दोनमधील शिक्षकांच्या बदल्यांची यादी ऑनलाईन जाहीर झाली. ऑनलाईन बदल्यांसाठी शिक्षकांना शाळांचे पर्याय सॉफ्टरवेअरमध्ये भरावी लागत आहे.

सुरवातीला संवर्ग 1 म्हणजेच दिव्यांग, 53 वर्षांवरील शिक्षक, विधवा, परितक्त्या शिक्षकांचा विचार केला जातो. यामध्ये 1 हजार 213 शिक्षक पात्र ठरले आहेत. त्या शिक्षकांना बदलीसाठीचे शाळा विकल्प भरावयाचे होते. यासाठी सहा दिवसांची मुदत होती. त्यामध्ये 269 शिक्षकांनी प्राधान्यक्रमानुसार शाळांची नावे ऑनलाईन भरली होती. 944 शिक्षकांनी बदली प्रक्रियेतून माघार घेतली. तर 28 जणं हे बदली पात्रच्या यादीत असल्यामुळे त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. 241 शिक्षकांच्या बदलीची यादी जाहीर झाली; मात्र बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित शाळांवर रुजू होण्यासंदर्भात अजूनही सुचना प्राप्त झालेल्या नाहीत. या प्रक्रियेमध्ये बहूसंख्य शिक्षकांना अपेक्षित शाळा मिळाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. प्राधान्यक्रमामध्ये एक ते तिस विकल्प भरावयाचे होते. त्यानुसार शिक्षकांनी शाळांची नावे भरलेली होती. बदली झालेल्यांपैकी बहुसंख्य शिक्षकांना पहिल्या क्रमांकाच्या शाळेत बदली झालेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे.
 

जिल्ह्यात 1 हजार 213 प्राथमिक शिक्षक बदल्यांसाठी पात्र होते. संवर्ग एक शिक्षकांचा समावेश असून यात पेसा भागात (आदिवासी भागात) किमान तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांचा यात समावेश असतो. या संवर्गातील शिक्षकांना 10 जानेवारी ते 14 जा- नेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर संवर्ग 4 मधील बदली पात्र शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया होणार आहे. या चारही संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर 18 फेब्रुवारीपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आणि उर्दू माध्यमासाठी 272 शिक्षकांचा समावेश आहे. असे असलेतरी अजूनही 1 हजार 332 शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रिकरण (संवर्ग दोन) साठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. एकूण 106 जणांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यापैकी 105 जणांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या आहेत. एक अर्ज काही तांत्रिक गोष्टीमुळे फेटाळण्यात आला आहे.