रत्नागिरी:- समुद्रमार्गे भारतामधून पाठवलेला आंबा २५ दिवसानंतर अमेरीकेच्या बाजार पेठेत यशस्वीरीत्या पोचला. कंटेनरमधील आंबा सुस्थितीत पोहचल्याचे निदर्शनास आल्यामुळे आयातदारांसह निर्यातदारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे निर्यातीवर होणार्या खर्चात कपात होणार असून हा खर्च किलोला एक डॉलरपर्यंत येईल. तसेच अमेरिकेच्या बाजारात आंब्याचा दरही कमी होईल, असा विश्वास पणन मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
भाभा टोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा यांनी आंबा कंटेनर व्दारे पाठविण्याचा निर्णय घेऊन सानप ग्रो निमल्स या निर्यातदाराच्या मदतीने आंबा समुद्रमार्गे पाठविण्यात आला. यामुळे अमेरीकेत आंब्याच्या निर्यातीत वाढ होणार असून आंबा कमी किमतीत ग्राहकापर्यंत पोचेल. सध्या आंब्याचे विमान भाडे ५५० रुपये प्रती किलो असून तीन किलोच्या बॉक्सकरीता सुमारे २० ते २२ डॉलर आकारले जातात. हा खर्च १ डॉलर प्रती किलोपर्यंत येवून निर्यातीस मोठी चालना मिळेल. तसेच अमेरीकन बाजारात भारतीय आंबा किमतीच्या दृष्टीने स्पर्धात्मक ठरुन इतर देशांच्या आंब्याशी स्पर्धा करु शकतो. विमान वाहतूक ऐवजी समुद्रमार्गे निर्यात होवून निर्यातीत वाढ होईल. हवाई वाहतुकीत होणारे नुकसान टाळण्यास मदत होवून आंबा अधिक चांगल्या पध्दतीने आणि उत्तम स्थितीत परदेशी बाजारात पाठवला येणार आहे. अमेरिकेबरोबरच अन्य देशातही हा प्रयोग करता येऊ शकतो. भाभा अॅटोमिकचे डॉ. गौतम, पंणनचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, अमेरीकेच्या डॉ. कॅथरीन फिडलर यांच्यासह बीएआरसी व एनपीपीओ चे अधिकारी, सानप ग्रोअॅनिमल्सचे हेमंत सानप, पणनचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, अभिमन्यू माने, सुशिल चव्हाण यांचे प्रयत्न होते.