रत्नागिरी:- गणपतीपुळे-नेवरे मार्गावर हॅलिपॅडजवळच्या वळणावर बुधवारी (२३ जुलै २०२५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दुचाकीवरील १९ वर्षीय तरुण आणि २० वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहेकों/८३४ रोशन चंद्रकांत सुर्वे यांनी २४ जुलै रोजी रात्री ९.१४ वाजता दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अभय अभिमन्यु शिरगावकर (वय ५५, रा. निवेंडी, ता.जि. रत्नागिरी) हे आपली टाटा झेस्ट कार (एम.एच.०८/एजी/३८१२) घेऊन निवेंडी ते रत्नागिरी मार्गावरून प्रवास करत होते. गणपतीपुळे गावापुढे नेवरे गावाच्या अलीकडे, हॅलिपॅडजवळच्या तीव्र वळणावर आले असता, कारचालकाने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता आणि अतिवेगाने व बेदरकारपणे वाहन चालवल्याने त्यांची कार विरुद्ध दिशेने गेली.
याचवेळी नेवरे गावाकडून येणाऱ्या मोटारसायकलला (एम.एच.०८/एडी/१९५८) त्यांच्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार अथर्व जगदीप पाटील (वय १९, रा. अपेक्षा हॉस्पिटल, बॉम्बे हॉटेल चौक, सातारा, सध्या रा. मुलांचे वसतिगृह, पटवर्धनवाडी, रत्नागिरी) आणि त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची मैत्रीण अर्चना कृष्णा (वय २०, रा. ग्वाल्हेर लाईन, वानवाडी बाजार, आर्मी कँट, पुणे, सध्या रा. मुलींचे वसतिगृह, पटवर्धनवाडी, रत्नागिरी) यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या. तसेच, दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर जखमी अथर्व पाटील आणि अर्चना कृष्णा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुर.आर.क्र.१४६/२०२५ अन्वये आरोपी अभय शिरगावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला बीएनएसएस ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहनचालकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.