Tuesday, August 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवेंडी एमआयडीसीसाठी प्रतिगुंठा २८ हजार ५८८ रुपये

निवेंडी एमआयडीसीसाठी प्रतिगुंठा २८ हजार ५८८ रुपये

जमीन मोबदला दरावर शिक्कामोर्तब : ४४६ खातेदारांना लवकरच मोबदला

रत्नागिरी:- कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना स्थानिक पातळीवरच प्रक्रिया उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी आखण्यात आलेल्या तालुक्यातील निवेंडी एमआयडीसी आणि मँगो-कॅश्यू पार्कच्या भूसंपादनाला आता मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी महसूल प्रशासनाला एमआयडीसीकडून तब्बल १२० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. निवेंडी व तळेकरवाडी परिसरातील ४४६ खातेदारांना लवकरच मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी प्रती गुंठा २८ हजार ५८८ रुपये (प्रतिहेक्टरी – २८ लाख ५८ हजार ८०० रुपये) असा अधिकृत दर जाहीर करण्यात आला आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन वर्षांपूर्वी निवेंडी परिसरात सुमारे १०० हेक्टर जागेवर आंबा व काजू प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी आणि मँगो-कॅश्यू पार्क उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर प्रशासकीय पातळीवर मोजणी आणि जागेची निश्चिती वेगाने पूर्ण करण्यात आंली. या प्रकल्पासाठी निवेंडी येथील ९१.२३ हेक्टर आणि तळेकरवाडी येथील ७.५६ हेक्टर अशी एकूण ९८.७९ हेक्टर (सुमारे १०० हेक्टर) जागा निश्चित करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरीतील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रक्रिया उद्योगाची मागणी करत होते. यापूर्वी केवळ घोषणांच्या टप्प्यावर अडकलेला हा प्रकल्प प्रांताधिकारी जीवन देसाई व महसूल यंत्रणेच्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रत्यक्ष निधी वाटपाच्या टप्यात पोहोचला आहे. १२० कोटी रुपयांचा मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याने आणि लवकरच प्रत्यक्षात कारखाने उभे राहणार असल्याने या भागातील आर्थिक चक्राला आणि स्थानिक रोजगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.

हरकतींची सुनावणी पूर्ण; दरावर अखेर शिक्कामोर्तब

प्रस्तावित भूसंपादनाबाबत स्थानिक जमिनींच्या मालकी हक्कांवरून आणि दरांबाबत परिसरातून सुमारे ४५ हरकती दाखल झाल्या होत्या. महसूल प्रशासनाने या सर्व हरकतींवर रितसर सुनावणी पूर्ण करून प्रक्रिया मार्गी लावली. नगररचनाकारांकडे पाठवलेल्या मूल्यांकनानुसार एमआयडीसीने प्रती हेक्टरी २८ लाख ५८ हजार ८०० रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार आता १२० कोटी रुपयांचा निधी प्रांताधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. निवेंडीमधील ४०३ आणि तळेकरवाडीतील ४३ अशा एकूण ४४६ खातेदारांच्या (९९ सातबारा उतारे) खात्यावर हा मोबदला लवकरच वर्ग होणार आहे.