दोघांच्या मृत्यूचे प्रकरण; ‘विद्युत निरीक्षण’चा प्राथमिक अहवाल
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथे महावितरण कंपनीच्या तुटलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे निवळी परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. या अनुषंगाने रत्नागिरी विद्युत निरीक्षण विभाग कार्यालयाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. या अपघाताचा अहवाल या विभागाने सादर केला आहे. यामध्ये महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचे स्पष्ट उल्लेख करत महावितरण जबाबदार असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
अपघातग्रस्तांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहणार आहे. प्राथमिक अहवाल महावितरण ग्रामीण उपविभाग क्र. १ या कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. यामध्ये स्पष्ट म्हटले आहे, देखभाल व दुरुस्तीचा अभाव दिसून आला. विद्युतवाहक तुटल्याने, तार मार्गास स्पेसर्स / गार्ड लूप न बसवल्याने, ताराच्या मार्गात वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी न केल्यामुळे ही घटना घडली आहे. निवळी दुर्घटनेसंदर्भात सुरक्षा व विद्युत पुरवठासंबंधीचे उपाययोजना न केल्याचे विद्युत निरीक्षण कार्यालयाचे म्हणणे आहे.
वारसांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. ही माहिती विद्युत निरीक्षण विभाग रत्नागिरी कार्यालयातून प्राप्त झाली आहे; मात्र प्राथमिक अभिप्राय किंवा प्राथमिक अहवाल जरी आला असला, तरीदेखील या घटनेची सविस्तर चौकशी सुरूच राहणार आहे.