निर्बंधमुक्त शिमगोत्सवामुळे गावागावात शेकडो चाकरमानी दाखल 

रत्नागिरी:-कोरोनामुळे मागील दोन वर्षांमध्ये निर्बंधांचा परिणाम कोकणातील शिमगोत्सवावर झाला होता; मात्र यंदाचा शिमगा शासनाकडूनच निर्बंधमुक्त केल्यामुळे लाखो मुंबईकर एसटी बंद असतानाही कोकण रेल्वे, खासगी गाड्यांमधून कोकणात दाखल झाले आहेत. सर्वाधिक गर्दी कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांना होती. अनेक चाकरमान्यांना अक्षरशः लोंबकळत प्रवास करण्याची वेळ आली होती. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाची कामे चालू असल्याने अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत होत्या.

एसटीचे आंदोलन अजुनही सुरुच असल्यामुळे कोकणात शिमगोत्सवासाठी येणार्‍या सर्वसामान्य चाकरमान्यांना कोकण रेल्वेचा पर्याय अवलंबावा लागला. अनेकांनी महिन्यापुर्वीच आरक्षण करुनही प्रतिक्षा यादीतच रहावे लागले. गेल्या चार ते पाच दिवसात कोकण रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होती. गुरुवारी (ता. 17) त्यात मोठी वाढ झाली होती. गाडीत बसण्यासाठी जागा न मिळाल्यामुळे प्रवाशांनी उभे राहून लटकतच घर गाठावे लागले. गुरुवारी मुंबईमधून रात्री धावलेली कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये तर गर्दीचा कहरच झाला. ठाणे येथे थांबा असूनही या ठिकाणी आरक्षण असलेल्या प्रवाशांना गाडीत जागा मिळाली नाही. अनेकांनी हीबाब कोकण रेल्वेच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली होती. आरक्षीत डब्यांमध्ये जाण्यासाठी जागा नव्हती.

होळी सणासाठी यावर्षी रेल्वेकडून गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. पण ठराविक जादा गाड्या असल्यामुळे गर्दी उसळली होती. हा उत्सव पुढील पाच दिवस सुरू राहणार आहे.

रेल्वे वगळता अनेकांनी खासगी बसचा पर्याय आहे. मात्र मुंबई, पुण्यातून आलेल्या अनेक गाड्यांची तिकीटे अव्वाच्या सव्वा होती. त्यामुळे तिनाईलाजाने या खासगी सेवेचा आधार घ्यावा लागत असल्याची प्रतिक्रिया अनेक चाकरमानी वर्गाने व्यक्त केली आहे. लाखापेक्षा अधिक चाकरमानी दाखल झाले होते. अनेकांनी स्वतःच्या खासगी वाहनानाने कोकणात दाखल झाले. त्यात अलिशान कारसह रिक्षा, दुचाकींचाही समावेश होता. आगामी दोन दिवसात अनेक कार्यक्रमाची रेलचेल असल्यामुळे सह कुटुंब येणे पसंत केले. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरही प्रचंड गर्दी होती. सायंकाळच्या वेळी रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या. चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे डायव्हर्शनच्या ठिकाणी वाहनांना थांबून रहावे लागले. पण जिथे काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे, तिथे मात्र प्रवास सुकर झाला.