रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर विविध उत्सवांपासून रत्नागिरीकर वंचितच राहीले होते. गेल्या काही दिवसात कोरोनावर नियंत्रण येत असल्यामुळे भक्तीभावाने जिल्ह्यात सोमवारी (ता. 15) माघी गणेशोत्सवाला सुरवात झाली. सोशल डिस्टन्सिग पाळत 71 ठिकाणी श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली. विविध मंदिरांच्या यात्रा गर्दी टाळण्यासाठी रद्द केल्या आहेत. माघीच्या दिवशी गणपतीपुळेत श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थिती लावली.
कोरोनामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी सुरु झाली. त्यानंतर आलेले सर्वच पारंपरिक सण साजरे करण्यावर बंधने आली होती. ऐन कोरोनात आलेला गणेशोत्सव सणही साजरे करताना नियमांचे पालन करावे लागत होते. भितीच्या छायेखाली अनेकांनी संयमाने घरातल्या घरात राहून उत्सव साजरे करण्याचा आनंद घेतला. सप्टेंबरनंतर हळूहळू कोरोना नियंत्रणाखाली येऊ लागला आहे. अधूनमधुन कोरोनाचे रुग्णांमध्ये चढ-उतार सुरु आहेत. या परिस्थिती आलेल्या माघी गणेशोत्सवावार कोरोनाचे सावट असले तरीही जिल्ह्यात भक्तीभावाने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात आलेल्या गणेशोत्सवातील भाविकांचा आनंद माघीच्या रुपाने साजरा करण्याची संधी मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळांनी मुर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. ठिकठिकाणी आरत्यांचे सुर घुमू लागले आहेत. माघीला गणपतीपुळेत मोठ्याप्रमाणात गर्दी होते. ती टाळण्यासाठी देवस्थान कमिटीने यात्रा रद्द केली. सोमवारी सकाळी प्रतिवर्षाप्रमाणे गणपतीची पुजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर मंदिरात आलेल्यांना दर्शनाची व्यवस्था केली होती. दिवसभरात हजारो भक्तगणांनी दर्शन घेतले.









