निधीची कमतरता मिऱ्या बंधाऱ्याचे मोठे दुखणे

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम आता महत्त्वपूर्ण टप्प्यावर आले आहे. मिऱ्या बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे दूर झाले असले, तरी निधीची कमतरता अद्यापही प्रकल्पासमोर मोठे आव्हान ठरत आहे.

मिऱ्या बंधाऱ्याच्या कामात नगर पालिका रस्ता आणि वन विभागाच्या जमिनीचा मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्याने हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. बंधारा बांधताना तो समुद्रात आत घेतल्यामुळे किनारपट्टीची साधारण ४० फूट जागा समुद्रात सरकली असून, यामुळे भविष्यातील धूप थांबवण्यास मोठी मदत होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ३०० मीटर अंतरावरील काम स्टार बसरा या जहाजामुळे रखडले होते. आता ते जहाज तिथून हटवण्यात आले असून, या भागातील काम सुरू करणे सोयीचे झाले आहे. मुरुगवाडा येथील १२०० मीटरचे काम अद्याप बाकी असून, जहाज हटल्याने आता या कामालाही गती मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी सुरुवातीला १८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

सुरू असलेले काम पूर्ण करण्यासाठी सध्या २५ कोटी रुपयांच्या तातडीच्या निधीची आवश्यकता आहे.
अपेक्षित तुटवडा: संपूर्ण बंधारा आणि उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी एकूण ८० ते ९० कोटी रुपयांच्या निधीची अडचण भासत आहे. मिऱ्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यास परिसरातील या किनारी भागाला समुद्राच्या लाटांपासून मोठे संरक्षण मिळणार आहे. सध्या प्रशासनाचे लक्ष उर्वरित १२०० मीटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लागून राहिले आहे.