रत्नागिरी:-शासकीय बंदी उठल्यानंतर समुद्रावर स्वार न झालेल्या काही मच्छीमारांनी नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधत मासेमारी सुरु केली आहे. खोल समुद्रात जाणार्या ट्रॉलर्स्ना म्हाकुळने तारले असले तरीही गिलनेटवाल्याची गेल्या चार दिवसात निराशाच झाली आहे. किनारी भागात मासळी येण्यासाठी त्यांना उपर्या (मुंबईकडून येणार्या) वार्यांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पावसाळ्यातील बंदी उठल्यानंतरही पहिल्या पंधरवड्यात वेगवान वार्यांचा मच्छीमारीमध्ये अडथळा सुरुच होता. कोरोनाच्या नियमांसह अनेक मच्छीमारांना वेळेत दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद करता न आल्याने शासकीय मुहूर्त साधता आला नव्हता. त्यामुळे रविवारी (ता. 22) नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्राला नारळ अर्पण करुन मासेमारीला सुरुवात केली. चाळीस टक्केहून अधिक मच्छीमार परिस्थिती पाहून आधीच समुद्रावर स्वार झालेले होते. जुन्या परंपरा या औपचारीकताच राहिल्या आहेत. सध्या ट्रॉलिंग आणि गिलनेटवाल्यांना मासेमारीसाठी परवानगी आहे. पर्ससिननेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
सध्या ट्रॉलिंग वाल्यांना 20 ते 22 वावात म्हाकुळ मासा मिळू लागला आहे. एक ते दोन टन मासा जाळ्यात सापडत असल्याने मच्छीमार समाधानी आहेत. किलोला 180 ते 210 रुपये दर मिळतोय. सुरवात चांगली झाली नव्हती. सध्या वातावरण निवळू लागल्यामुळे खोल समुद्रात मासळी सापडत आहे. आठ दिवसांपुर्वी चिंगळांचा या मच्छीमारांना आधार होता. सुरमई, पापलेट यासारखी मासळी सप्टेंबरनंतर मिळेल असा अंदाज आहे. मिरकरवाडा, हर्णै यासह जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या बंदरातील मच्छीमारांची रेलचेल सुरु झालेली आहे.
उलट परिस्थिती गिनलेटद्वारे मासेमारी करणार्यांची आहे. गेले दोन ते तिन दिवस पाच ते दहा वावात मासेमारी करणार्यांना मासळीच मिळत नाही. मिर्या, साखरतर, काळबादेवीतील मच्छीमारी गणपतीपुळेपर्यंत मासेमारीला जातात; परंतु जाळी मारुनही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. पेट्रोल खर्चाचा भुर्दंड त्यांच्यावर आहे. या कालावधीत पापलेट, चिंगुळ, बांगडा चांगल्या प्रकारे सापडतो. सध्या पश्चिमकेडून वारे वाहत आहेत. त्याचा रोख बदलल्याशिवाय किनार्याकडे मासे येणार नाहीत अशी अटकळ बांधली जात आहे. मुंबईतून येणारे म्हणजेच उपरे वारे सुरु झाले की पुन्हा गिलनेटला मासा मिळू लागेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.