रत्नागिरी:- नाणीजजवळ रत्नागिरी-लातूर बसला ट्रकने धडक देऊन अपघात झाल्याने या अपघातात चालक, वाहकासह 13 जण जखमी झाले. यातील सात जणांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर एका रुग्णाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काहींना पाली प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रथमोपचार करुन घरी पाठवण्यात आले.
रत्नागिरी-लातूर ही बस (क्रमांक MH20- BL-1254) सकाळी सात वाजता रत्नागिरी आगारातून सुटली. या बसला नाणीज नजिक वळणावर एका ट्रकने (क्रमांकMH- 13-CQ-4575) धडक दिली. या धडकेने एस.टी. मधील चालक, वाहक व 11 प्रवासी जखमी झाले. हा अपघात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची रत्नागिरीचे एस.टी. विभागीय वाहतूक अधिकारी अनिल म्हेत्तर, विभागीय वाहतूक अधिक्षक अनंत जाधव व अन्य अधिकारी यांनी तात्काळ भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच प्राथमिक खर्चासाठी म्हणून सुमारे 8 ते 9 हजार रुपयांची आर्थिक मदतही केली.