Wednesday, November 11, 2026
spot_img
Home रत्नागिरी नाखरे येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू

नाखरे येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे बोरभाटलेवाडी येथे विहिरीत पडून एका ३३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रियांका लक्ष्मण आडविलकर (वय ३३ वर्षे, रा. नाखरे बोरभातलेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मयत तरुणीचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे नाखरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रियांका आडविलकर ही गेल्या १६ वर्षांपासून मानसिक तणावाखाली होती. दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मानसिक तणावात असतानाच ती घराबाहेर पडून विहिरीच्या दिशेने गेली. त्यावेळी तिचा तोल जाऊन किंवा अनावधानाने ती विहिरीच्या पाण्यात पडली. ही बाब कुटुंबीय व स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेऊन तिला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर तिला उपचारासाठी पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रियांका हिला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती तिचे वडील लक्ष्मण महादेव आडविलकर यांनी पोलिसांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र पावस यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पूर्णगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (अ.मृ. क्रमांक ४१/२०२६) अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.