रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सुधारित नळपाणी योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने शहरवासियांवर पाणी-पाणी करण्याची वेळ आलेली आहे. प्रशासनावर विश्वास ठेवून केल्या जात असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करून लोकप्रतिनिधींनी देखील पळवाट काढलेली आहे. अशावेळी या योजनेची हायड्रोलिक प्रेशर टेस्टींगसाठी समिती गठीत केली जावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
सुधारित नळपाणी योजनेच्या हायड्रोलिक प्रेशर टेस्टिंगचे काम गणेश चतुर्थीपूर्वी सुरू करण्यात आलेले होते. मात्र ते काम गणेशविसर्जनानंतर सुरू करावे अशी सुधारणा नगर परिषद प्रशासन कार्यालयामार्फत केली गेली. आता गणेश विसर्जन झाले असून हे काम करण्यासाठी सुरूवात होणार असल्याचे मिलींद कीर यांनी सांगितले. हे काम करत असताना जिल्हा प्रशासनस्तरावरून हे काम समितीची निर्माण करून त्या समितीमार्फत व्हावे अशी मागणी कीर यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केल्याचे सांगितले.
त्या समितीमदये एम.जी.पी.चे दोन अभियंता, नगर परिषदेचे दोन अभियंता, क्वॉलिटी कंट्रोल (गुणवत्ता नियंत्रण) विभागात दोन अनुभवी सुजान नागरिक यांची समिती नेमावी व त्यांचे उपस्थितीत टेस्टिंग करण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यासाठी यापूर्वी मुख्याधिकारी, कार्यकारी अभियंता म.जि.पा. रत्नागिरी यांना वारंवार पत्रव्यवहार केलेले असल्याचे सांगितले. ही योजना गेली 6 वर्षे सुरू आहे. योजना पूर्ण करण्याची कालमर्यांदा दोन वर्षांची असताना सुमारे 6 वर्षे ही योजना रखडलेली आहे. या योजनेला अजूनही सुमारे 1 वर्ष पूर्ण होण्यासाठी लागेल.
पण या योजनेचे ठेकेदार अनुभवी नसतानासुध्दा गैरमार्गाने हे काम संबधित ठेकेदार अन्वी कन्स्ट्रक्शनला दिल्यामुळे ही योजना लांबल्याचा आक्षेपही मिलींद कीर यांनी घेतला आहे. त्याचपमाणे त्याच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर आवाज उठविला आहे. नागरिकांनी देखील तकारी दिलेल्या आहेत. त्यासाठी या योजनेची हायड्रोलिक टेस्टींग ही महत्वाची बाब आहे. म्हणून आपल्या अधिकारामध्ये ही समिती गठीत करून हायड्रोलिक टेस्टिंग व्हावी अशी मागणी कीर यांनी केली आहे. तोपर्यंत नगर परिषदेला हायड्रोलिक टेस्टिंगचे कोणतेही बील अदा करण्यात येउ नये असे आदेश देण्याची मागणी मिलींद कीर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भोसले, ज्येष्ठ नेते कुमार शेटये हे देखील उपस्थित होते.
ठेकेदार, मुख्याधिकार्यांसह 11 जणांविरोधात न्यायालयात धाव
रत्नागिरी नगर परिषदेच्या सुधारित नळपाणी योजनेच्या कामाबाबत माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी धक्कादायक प्रकार व्यक्त केला आहे. योजनेचे काम करणार्या अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीने बनावट कागदपत्रे तयार करून या योजनेचा ठेका मिळवला. तो मिळवण्यासाठी या ठेकेदाराने कोल्हापूर, सांगली आदी भागातील बनावट कागपत्रे तयार करून त्या आधारे ठेका मिळवल्याची तक्रार महेश थिटे (सोलापूर) यांनी रत्नागिरीच्या न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केल्याचे माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामध्ये ठेकेदार, मुख्याधिकार्यांसह 11 जणांविरोधात ही तक्रार दाखल केल्याचे सांगितले.









