सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात; दोन तासात होणार चित्र स्पष्ट
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदांसह तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिकनिवडणुकांची मतमोजणी रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. सात नगराध्यक्ष आणि 202 नगरसेवकांच्या भविष्याचा फैसला रविवारी जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठी महसूल आणि पोलिस यंत्रणेचे नियोजनही पूर्ण झाले आहे. मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार असली तरी या प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळी 6 वाजता मतमोजणीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तांत्रिक बाबींमुळे निकाल लांबणीवर पडला असून हा निकाल रविवारी जाहीर करण्यात येणार आहे. निकालाची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. चार नगर परिषद आणि तीन नगर पंचायती यांच्याकरिता 68.14 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान गुहागर नगर पंचायत करीता नोंदवण्यात आले. गुहागर नगर पंचायतीसाठी 75.26 टक्के, रत्नागिरी 55.09 टक्के, चिपळूण 64.15 टक्के, खेड 62.53 टक्के, राजापूर 74.55 टक्के, लांजा 72.06 टक्क आणि देवरुख 74.33 टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली होती.
रत्नागिरी नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संत गाडगेबाबा सभागृहात होणार आहे. रत्नागिरी शहरात 16 प्रभाग असल्याने मतमोजणीसाठी प्रभागनिहाय 16 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. तर चिपळूण नगर परिषदेची मतमोजणी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात 14 टेबलवर होणार आहे. खेडची मतमोजणी नगर परिषदेच्या सभागृहातील पाच टेबलवर होणार आहे.
राजापूर नगर परिषदेची मतमोजणी नगर परिषद सभागृहातच होणार असून येथे मतमोजणीसाठी पाच टेबल आहेत. लांजा नगरपंचायतीची मतमोजणी तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहातील सात टेबलवर तर देवरूख नगरपंचायतीची सभागृहातील 9 टेबलवर मतमोजणी होणार आहे. गुहागर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी श्री दे.गो.कृ.मा. विद्यालय सभागृहात होणार आहे. याठिकाणी 6 टेबलचे नियोजन करण्यात आले आहे.
दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व नगर परिषद, नगरपंचायतींचे निकाल स्पष्ट होणार आहेत. मात्र विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यासाठी आणखी एक तासभर अधिक लागणार आहे. विजयी झालेल्या उमेदवाराची माहिती राज्य निवडणूक आयोगाला ऑनलाईन पाठवल्यानंतर येणाऱ्या निर्देशानुसार विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटप केले जाते.
सकाळी 10 वा. मतमोजणी सुरु
रविवारी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. परंतु मतमोजणीसाठी नियुक्त महसूल आणि त्या त्या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना सकाळी 6 वाजता मतमोजणी केंद्रांवर उपस्थित रहावे लागणार आहे









