नऊ पैकी चार तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

जिल्ह्यात 29 पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 477 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केवळ 29 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. चोवीस तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूसंख्या 309 झाली आहे. जिल्ह्यातील 4 तालुक्यात एकही रुग्ण सापडला नाही.
 

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात सर्वाधिक 17 रुग्ण सापडले आहेत. तर दापोली 2, गुहागर 4, चिपळूण 4 आणि लांजा तालुक्यात 2 असे एकूण 29 रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळले आहेत. ज्यामध्ये 15 जणांचे अंटीजेन अहवाल व 14 जणांचे आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह सापडले आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. प्रत्येक तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण खालावत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात केवळ 29 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 हजार 271 वर पोचली आहे. तर याच कालावधीत तब्बल 477 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 46 हजार 456 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बुधवारी तब्बल 15 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आतापर्यंत 7 हजार 624 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.17 टक्के आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून आता पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे 309 बळी झाले आहेत.