धोकादायक! ब्रिटिशकालीन बावनदी पुलाचा कठडा कोसळला, पावसाळ्यात पुलाला धोका?

संगमेश्वर:-मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बावनदी पूल सध्या धोकादायक स्थितीत असून पुलाचे कठडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नुकतेच या पुलाचे आणखी दोन कठडे कोसळले आहेत. संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने येताना डाव्या बाजूला असलेल्या पुलावरील हे कठडे कोसळले आहेत. उन्हाळ्यात पुलाचे कठडे कोसळत असतील तर पावसाळ्यात काय या स्थिती होईल. पुलाचे पावसाळयापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करुन वाहतुकीसाठी योग्य आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. अन्यथा सावित्री नदीसारखी दुर्घटना घडण्याची भीती आहे. नव्या पुलाचे कामही अर्धवट स्थितीत आहे. 

दरम्यान दोन-तीन वर्षापूर्वीच या पुलाच्या मध्यभागाचे कठडे कोसळले होते. त्यानंतर सा. बा. विभागाने या ठिकाणी रेलिंग बसवले. मात्र पांगरीच्या बाजूने येतानाचा पुलाचा संरक्षण कठडयाचे चिरे हलले होते. कोणत्याही क्षणी कोसळू शकतात अशी स्थिती होती. त्यानंतर सा. बा. विभागाने सिमेंटचा मुलाला फासला. मात्र व्हायचे तेच झाले. वरुन दिलेल्या सिमेंटच्या मुलाम्यालाही तडे गेले आणि येथील दोन्ही कठडे कोसळले. त्याशिवाय 1 जानेवारी 2022 रोजी रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जाणार्‍या कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांचा अपघात झाला होता. यामध्ये कंटेनर पुलाचा कठडा तोडून पुढील दोन चाके खालच्या बाजूला लटकलेल्या स्थितीत होती. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने कंटेनर चालकाला बाहेर काढण्यात आले. अन्यथा कंटेनर नदीत कोसळून जिवितहानी झाली असती. दैव बलवत्त म्हणून वाचला. तेव्हा तुटलेला कठडा नंतर सा. बां. विभागाने बांधला. संबंधित विभागानी वेळीच लक्ष देवून मोठी दुर्घटना टाळावी अशी मागणी होत आहे.