धामापूर बंधार्‍यात दोन तरुण बुडाले

रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यात धामापूर येथे रविवारी सायंकाळी 4 वा. सुमारास दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने माखजन करजुवे परिसरावर शोककळा पसरली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी याच ठिकाणी दोघा तरुणांचा बुडून मृत्यू ओढवल्याची घटना घडली होती.

या बाबत अधिक माहितीनुसार माखजन जवळच्या धामापूर घारेवाडीतील सहा तरुण भायजेवाडीतील बंधार्‍याजवळ गेले होते. याचदरम्यान शौचास जात असल्याचे सांगून शैलेश दत्ताराम चव्हाण (32) व केतन सुरेश सागवेकर (18) हे दोघे बांधार्‍याजवळच्या पाण्यात गेले. याच दरम्यान केतन सुरेश सागवेकर याचा पाय घसरुन तो पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच शैलेश चव्हाण हा त्याला वाचवायला गेला, परंतु तोही बुडू लागल्याने त्याने आरडाओरडा केल्यावर तेथे असणार्‍या चौघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याची खबर गावातील लोकांना समजताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. संध्याकाळी दोघांचे मृतदेह माखजन प्रा. आ. केंद्रात आणण्यात आले. मृतदेहाचे विच्छेदन डॉ. प्रदीप शिंदे यांनी केले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.