परजिल्ह्यातील व्यावसायिकांना लसीचे दोन डोस अत्यावश्यक
रत्नागिरी:- तब्बल दोन वर्षानंतर रत्नागिरीचा आठवडा बाजार गजबजणार असून येत्या शनिवारपासून बाजार भरण्यास नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान परजिल्ह्यातील व्यावसायिकांना लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.
कोरोनाचा शिरकाव झाल्यानतर रत्नागिरीचा आठवडा बाजार बंद पडला होता. तब्बल दोन वर्ष हा बाजार बंद होता. सर्वत्र अनलॉक झाले असताना हा बाजार सुरु करावा अशी मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत बाजार सुरु करावा अशी आग्रही मागणी नगरसेवक राजन शेट्ये व विकास पाटील यांनी लाऊन धरली. यावेळी सभागृहात सर्व पक्षीय नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा देत बाजार सुरु करण्यावर सभागृहात एकमुखी ठराव करण्यात आला.
याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले कि, बाजार सुरु व्हावा यासठी शहरातील सर्व छोटे व्व्यापारी मागणी करीत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जो पर्यंत कमी होत नाही तो पर्यंत बाजार सुरु करणे शक्य नव्हते. आता कोरोना आटोक्यात आला आहे.त्यामुळे आठवडा बाजार सुरु करण्याची परवानगी दिली असल्याचे साळवी यांनी सांगितले.
तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याला दोन डोस बंधनकारक करण्यात आले असल्याचे साळवी यांनी सांगितले. नगर परिषद मालमता विभाग व आरोग्य विभागाकडून व्यावसायिकांनी लसीचे दोन डोस घेतले कि नाही याची पडताळणी केली जाणार असल्याचे साळवी यांनी सांगितले.