दोन वर्षांनी गुढी, नववर्षाची जल्लोशी स्वागत यात्रा

रत्नागिरी:– हिंदू एकतेचे विराट शक्तीप्रदर्शन करत आज गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा भव्यदिव्य रूपात पाहायला मिळाली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांसह प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवरायांचा जयजयकार करण्यात आला. ढोलपथक, सजीव देखावे, चित्ररथांसह निघालेली ही मिरवणूक चार ते साडेचार तास सुरू होती. ग्रामदैवत श्री भैरी मंदिरातून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता समाजमंदिर पतितपावन मंदिरात हिंदुत्वाची शपथ घेऊन झाली



पारंपरिक वेषभूषेमध्ये स्वागतयात्रा रंगतदार झाली.  ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात गाऱ्हाणे होऊन स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. या स्वागतयात्रेचे अठरावे वर्ष होते. कोरोना महामारीमुळे निर्बंध असल्याने दोन वर्ष या यात्रेत खंड पडला. परंतु यंदा शक्ती प्रदर्शन करत ही यात्रा जय्यत झाली. चित्ररथ, ढोल-ताशा पथक, यासह विविध सामाजिक, पौराणिक, पर्यावरण विषयक देखावे यामध्ये साकारले होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी, माजी आमदार बाळ माने हेसुद्धा या यात्रेत सहभागी झाले. रत्नागिरीकरांनी ख्यालीखुशाली त्यांनी विचारली तसेच नागरिकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.



ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदुकेश्वर संस्था, श्री पतितपावन मंदिर संस्था आयोजित या यात्रेतून हिंदू एकतेचे दर्शन घडले. श्री भैरी मंदिरातून सकाळी ९.३० वाजता यात्रा सुरू झाली. खालची आळी, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, गोखले नाका, मारुती आळी, जयस्तंभ, राम आळी, राधाकृष्ण नाका, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात या यात्रेची सांगता दुपारी १.३० च्या दरम्यान झाली. विविध ठिकाणी सरबत, ताक आणि आइस्क्रिमचे वाटप करण्यात आले.


सहभागी संस्था व चित्ररथ

भैरी देवस्थान (ग्रामदैवत श्री भैरी मूर्ती, पालखी), स्वच्छता रथ (खालची आळी), स्वराज्य संस्था (मराठीचा अभिमान), अखिल चित्पावन ब्राह्मण सहायक मंडळ, विठ्ठल मंदिर संस्था (भजनी पथक), गवळीवाडा मित्रमंडळ (भारताच्या विरांगना), विक्रांत मित्रमंडळ (शिमगा), संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज (पंढरपूर देखावा), एम. एम. वॉंडर किडझ ग्लोबल स्कूल (वृक्षतोड रोखा), रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी (स्त्री शिक्षण), राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था (हो ईश्वर आहेच), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रत्नागिरी शहर व्यापारी संघ (व्होकल फॉर लोकल), रत्नागिरी इलेक्ट्रिक व्यापारी संघ, श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान (पालखी सोहळा), राष्ट्रीय सेवा समिती (विविध सेवाकार्य), भंडारी समाज (भागोजीशेठ कीर चित्ररथ), जय भैरव नवरात्र उत्सव मंडळ मांडवी (पालखी सोहळा, ढोलवादन), रवळनाथ लक्ष्मीकांत मंदिर (श्रीकृष्ण देखावा), श्रीराम मंदिर संस्था, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, तेली समाज (संत तुकाराम), पतितपावन मंदिर संस्था (स्वा. सावरकर), भारतमाता चित्ररथ, राजस्थान क्षत्रिय संघ (वाद्य, नृत्य, महाराणा प्रताप), मरुधर विष्णू समाज, ओम साई मित्रमंडळ (शिवराय), श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (पावनखिंड), राजरत्न प्रतिष्ठान (मनोरुग्णांचे पुनर्वसन), शिवरुद्र, ब्रह्मनाद ढोल-ताशा पथक, विश्व हिंदु परिषद (गो रक्षा संघ), सनातन संस्था, स्वाभीमान स्पोर्टस क्लब (कारागिर देखावा), प्रजापिता ब्रह्माकुमारी (श्री विष्णू), स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक अध्यात्मिक केंद्र (बाल संस्कार केंद्र), (स्वामी समर्थ मराठी अस्मिता), पांचाळ सुतार समाज मंडळ (ढोलपथक, एसटी जीवनवाहिनी).