दोन महिन्यांच्या बाळाचा आकस्मिक मृत्यू

चिपळूण:- तालुक्यातील तिवरे राजवाडा येथे दोन महिने २६ दिवसांच्या एका चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार ५ जून रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. ‘ॲस्पिरेशन न्यूमोनिटिस’ हे मृत्यूचे कारण असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी नमूद केले आहे.

तिवरे, राजवाडा येथील कु. अक्षता मनोज पवार (वय २ महिने २६ दिवस) हिच्या मृत्यूची माहिती आशा सेविकेने प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथे फोन करून दिली. ही माहिती मिळताच, प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथील वाहनातून कु. अक्षताला तातडीने आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता, अक्षताला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात ५ जून रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.