बागायतदारांनी साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त ; डझनला 300 ते 800 रुपये दर
रत्नागिरी:- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस बाजारात पाठविण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस वाशी बाजारात हापूसच्या 67 हजार आणि 55 हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पेट्या आल्याचे वाशीतील व्यावसायीकांनी सांगितले. तर हापूसचा दर 300 ते 800 रुपये डझन विकला जात असून तुलनेत पाचशे रूपयांनी कमी आहे. मात्र मागील आठवड्यातील घसरण काही अंशी थांबल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला हापूस बाजारात विक्रीसाठी पाठविण्याची परंपरा आहे. त्यानंतर खर्या अर्थाने हंगाम सुरु होतो. परंतु यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून तुलनेत सर्वाधिक हापूस वाशीसह पुणे, अहमदाबाद, पश्चिम महाराष्ट्रातील विविध बाजारात दाखल झाला. लवकर आणि मुबलक आंबा विक्रीसाठी आला होता. 50 टक्केहून अधिक बागायतदारांनी पाडव्याला विक्रीचा मुहूर्त केलेला आहे. त्यांच्याबरोबर इतर बागायतदारांच्या मिळून सोमवारी (ता. 8) वाशी बाजारात दाखल झालेल्या 92 हजार पेटींपैकी हापूसच्या 67 हजार पेट्या आहेत. तर उर्वरित अन्य आंबे आहेत. मंगळवारी (ता. 9) 55 हजार पेटी आंबा कोकणातून दाखल झाल्याचे व्यावसायीकांनी सांगितले.
पाडव्याला एक लाख पेटी कोकणातून पाठवली जाते, ही परंपरा यंदाही कायम असल्याचे आकडेवारी पाहता दिसून येते. गतवर्षी याच कालवधीत 29 हजार आणि 40 हजार पेट्या आल्या होत्या. मात्र कर्नाटकसह अन्य आंब्यांची आवक कमी होती. यंदा हापूसची दुप्पट आवक आहे. दरम्यान, हंगामाच्या आरंभीला हापूसचा पेटीचा दर साडेसहा ते सात हजार रुपये होता. मात्र आवक वाढत गेली तसा दर कमी होऊ लागला. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पन्नास टक्क्यावर दर आले. त्यामुळे आंबा बागायतदार हादरले होते. आवक वाढण्याबरोबरच निर्यात करण्यातील अडथळेही कारणीभूत असल्याची कारणे वाशीतील व्यावसायीकांनी पुढे केली होती. रत्नागिरीतील बागायतदारांनी व्यावसयीकांशी संवाद साधत दर स्थिर ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही कालावधीसाठी पेटीचा दर 3700 रुपयांपर्यंत राहिला. सध्या दर्जेदार आंब्याला डझनला 800 रुपये दर मिळत असून सर्वात कमी वजनाच्या फळाला 300 रुपये दर मिळत आहे. गतवर्षी पाचशे रूपये अधिक दर होता. मात्र तेव्हा आवक कमी होती, असे व्यावसयीकांनी सांगितले.









