देवाचेगोठणे येथे तरुणाची आत्महत्या; दारूच्या नशेत उचलले टोकाचे पाऊल

राजापूर:- तालुक्यातील देवाचेगोठणे-राघववाडी परिसरात एका ३० वर्षीय कामगाराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत या तरुणाने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मौनेश बसाप्पा कट्टीमणी (वय ३०, रा. यादगीर, कर्नाटक; सध्या रा. देवाचेगोठणे, राजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मौनेश हा स्थानिक व्यावसायिक बाळू नारायण राठोड यांच्याकडे कामगार म्हणून कार्यरत होता. २० मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास देवाचेगोठणे येथील शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका झाडाला त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

​खबर देणारे बाळू राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौनेश याला दारूचे मोठे व्यसन होते. घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता आणि याच नशेत त्याने स्वतःचे जीवन संपवले. सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

​या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.