Thursday, May 7, 2026
spot_img
Home संगमेश्वर देवळे फाटा येथे दोन रिक्षांना कारची धडक, दोघे जखमी

देवळे फाटा येथे दोन रिक्षांना कारची धडक, दोघे जखमी

संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील देवळे फाटा येथे पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा दुरुस्त करणारे दोन तरुण जखमी झाले असून, दोन्ही रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात ५ मे रोजी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास ‘ओपन टेरेस हॉटेल’ जवळ घडला.

सांगली येथील रिक्षा चालक अनुप तुकाराम पाटील आणि नितीन सुरेश हुलवाने हे आपल्या रिक्षा घेऊन अंगारकी संकष्टीनिमित्त दर्शनासाठी सांगलीहून गणपतीपुळे येथे जात होते. देवळे फाटा येथे नितीन हुलवाने यांची रिक्षा (MH 10 4 3611) अचानक बंद पडली. त्यामुळे त्यांनी रिक्षा रस्त्याच्या कडेला लावली. त्यांना मदत करण्यासाठी अनुप पाटील यांनीही आपली रिक्षा (MH 08 AQ 3363) त्यांच्या पुढे उभी केली.

ज्यावेळी मजीर नजीर बुटलेर हे रिक्षा दुरुस्त करत होते आणि आनंदा अडसुळे हे बॅटरीच्या सहाय्याने उजेड दाखवत होते, त्याच वेळी कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या अल्टो कारने (MH 12 HF 7067) या दोन्ही रिक्षांना जोरदार धडक दिली.

​कार चालक अनिल शिवाजीराव पाटील (रा. येळावी, ता. तासगाव) याने कार अतिवेगात आणि बेदरकारपणे चालवून प्रथम नितीन हुलवाने यांच्या रिक्षाला धडक दिली, ज्यामुळे रिक्षा पलटी झाली. त्यानंतर कार अनुप पाटील यांच्या रिक्षावर जाऊन धडकली. या धडकेत रिक्षा दुरुस्त करणारे मजीर नजीर बुटलेर आणि आनंदा विजय अडसुळे (दोघेही रा. सांगली) हे जखमी झाले आहेत.

​याप्रकरणी अनुप तुकाराम पाटील यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कार चालक अनिल पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.