Thursday, September 3, 2026
spot_img
Home संगमेश्वर देवरूख येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

देवरूख येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख वरची आळी येथे एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. ओंकार दत्तात्रय शिंदे (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने देवरूख शहरात खळबळ उडाली असून, ओंकारने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ओंकारने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ओंकारच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ओंकारच्या अकाली निधनाने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.