लांजा:- तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशिराम धाक गोंधळी (वय ६५) हे लांजा तालुक्यातील देवधे गोंधळीवाडी येथे वास्तव्यास होते. काशिराम यांना गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर दारू पिण्याचे व्यसन होते. बुधवार, दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजेपूर्वी, दारूच्या नशेत असताना त्यांनी आपल्या घरातील एका खोलीच्या लाकडी वाशाला (कडीला) नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला.
घरातील लोकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. मात्र, गळफास लावल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही माहिती ११ मार्च रोजी रात्री १० वाजता पोलीस दप्तरी दाखल करण्यात आली.









