रत्नागिरी:- आपली मुलगी बरी व्हावी… तीने आजारावर मात करून पुन्हा हसत-खेळत हिंडावे यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मागील वर्षभरापासून ते मुलीची घरीच देखभाल करत होते. मुलीच्या काळजीने त्यांचा जीव सारखा तुटत होता. पोटच्या मुलीला होणाऱ्या वेदना, होणारा त्रास पाहून त्यांचे काळीज तीळ तीळ तुटत होते. मात्र नियतीने असा खेळ मांडला की दैवाने सर्वच हिरावून नेलं. कन्येचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिल्यामुळे हा धक्का सहन न झाल्याने नंदकुमार कदम यांचाही मृत्यू झाला. बाप-लेकीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
मूळचे बसणी येथील नंदकुमार कदम जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते. गेली जवळपास ते 25 वर्ष जि.प. भवनात विविध विभागात कार्यरत होते. मात्र नियतीने त्यांच्या कुटुंबावर एकप्रकारे घालाच घातला आहे. त्यांची मोठी मुलगी प्राजक्ता (वय 28) हिने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका खासगी नोकरीला लागली होती. त्याचबरोबर तिचे लग्नही ठरलं होतं. यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र हा आनंद फारवेळ टिकला नाही.एका वर्षांपूर्वी प्राजक्ता अशीच एकदा आजारी पडली होती. तपासणी केली असता तिला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कुटुंब अक्षरश: हादरून गेलं होतं. या परिस्थितीतही न डगमगता प्राजक्तावर उपचार सुरू झाले. पै पै जमा करून नंदकुमार कदम हे उपचारासाठी धडपड करीत होते. गेले वर्षभर ते अनेक वेळा रजा टाकून तिच्या उपचारासाठी जात होते. प्राजक्ता हळूहळू बरी होत होती. मात्र नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती.
दोन दिवसांपूर्वी घरात अचानक तिला फिट आली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नंदकुमार कदम यांनी तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यासाठी हालचाल सुरू केली. मात्र त्यांच्या हातावरच तिने अखेरचा श्वास घेतला. तिचा मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर झाला. लाडक्या कन्येचा मृत्यू पाहिल्याचा धक्का नंदकुमार कदम यांना इतका बसला की ते जाग्यावरच खाली कोसळले. डॉक्टरांकडे उपचारासाठी त्यांनी नेले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. बाप-लेकीच्या मृत्यूनंतर जि.प. भवन तसेच बसणी गावावर शोककळा पसरली.









