दुपदरीकरणाच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक 

30 ऑगस्टपर्यंत काम राहणार सुरू 

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते वीर येथील दुपदरीकरण अंतिम टप्प्यात आले असून काही स्थानकांवरील रुळ जोडण्यांच्या कामांसाठी २१ ते ३० ऑगस्ट या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांना त्या-त्या स्थानकांवर विशिष्ठ कालावधीसाठी थांबा देण्यात येणार आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्यानंतर कोकण रेल्वेही रुळावर येत आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापुर्वी दुपदरीकरणाची कामे पूर्ण करुन गाड्यांचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. वीर ते रोहा मार्गावरील ४५ किलोमीटरचे दुपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. काही ठिकाणी नवीन आणि जुने रुळ जोडण्याचे काम शिल्लक आहे. ते काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. यामध्ये काही रेल्वेस्थानकांवरील कामांचा समावेश आहे. या कामांचा गाड्यांच्या वेळापत्रकावर अधिक परिणाम होऊ नये यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कामाचे नियोजन केले आहे. त्यात २१  ऑगस्टला धावणारी तिरुवअनंतपूरम- लोकमान्य टिळक स्पेशल गाडी रत्नागिरी, चिपळूण व खेड या स्थानकांवर थांबवण्यात येणार आहे. जामनगर-तिरुनेलवल्ली कोलाड किंवा माणगाव स्थानकावर २.२० तास, २२ ऑगस्टला एलटीटी-थिरुतअनंतपुरम कोलाडला एक तास थांबेल. हापा मडगाव २५ ऑगस्टला पश्‍चिम रेल्वे मार्गावर तर थिरुतअनंतपुरम-एलटीटी रत्नागिरी किंवा चिपळूणात एक तास थांबेल. तिरुनवेल्ली- दादर वीर स्थानकात तीस मिनिटे थांबेल. जामनगर- तिरुनवेल्ली २७ ऑगस्टला पश्‍चिम रेल्वे मार्गावरील कामासाठी अडीच तास उशिराने धावणार आहे. २९ ऑगस्टला करंजाडी येथे एर्नाकुलम-अजमेर गाडी अर्धा तास थांबवण्यात येणर आहे. मडगाव- मुंबई विशेष गाडी ३० ऑगस्टला चिपळूण, खेड येथे थांबेल असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.