राजापूर-ओणीमधील अपघात, कोदवली परिसरावर शोककळा
राजापूर:- मुंबई-गोवा तालुक्यातील महामार्गावरील ओणीमधील गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात कोदवली येथील ४८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, संजय पुनाजी मांडवे (४८, रा. कोदवली-मांडवेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मांडवे हे त्यांची होंडा शाईन कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच.०१ ए.डब्ल्यू २८३०) घेऊन ओणी ते कोदवली असा प्रवास करत होते. महामार्गावरील रस्ता सरळ असतानाही संजय मांडवे यांनी वेगाने दुचाकी चालवली. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती बेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात संजय मांडवे यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी विजय पुनाजी मांडवे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी मृत संजय मांडवे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१). १२५ (अ), (व), २८१ आणि मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. ऐन दिवाळी सणात मांडवे यांच्या अपघाती निधनाने कोदवली परिसरावर शोककळा पसरली आहे.









