दीड महिन्यात ३१ हजार वाहन चालकांना ९७ लाखांचा दंड

रत्नागिरी:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये दिड महिन्याच्या कालावधीत तब्बल ३० हजार ९४० वाहन चालकांना ९७ लाख २८ हजार ३०० रुपयांचा दंड करण्यात आला आहेच. तर धक्कादायक म्हणजे विना हेल्मेट असलेल्या ८ हजार ४६० जणांना ४२ लाख ३० हजार रु.चा दंड करण्यात आला आहे. तर गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या वाहन चालकांविरोधात न्यायालयात खटला भरण्यात आला आहे. दिड महिन्यात जिल्हा वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातील कर्मचार्‍यांनी नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून हा दंड वसूल केला आहे.

‘रत्नागिरीकर, म्हणजे कायदा पाळणारे’ अशी ओळख राज्यात निर्माण झाली आहे. सरकारी नियम म्हणजे, त्याचे काटेकोरपणे पालन करणारा तो रत्नागिरीकर. कायद्याचा आदर सर्वाधिक जास्त कोठे होतो. असे कोणी विचारले, तर त्याचे उत्तर कोकण असेच होते. मात्र आता त्याला हळूळू वळण मिळायला लागले असल्याचे चित्र निर्माण होत आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दि.१५ एप्रिलनंतर राज्यात लॉकडाऊन सुरु करण्यात आले. राज्य सरकारने नागरिकांवर अनेक प्रकारचे निर्बंध घातले होते. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन शासनासह प्रशासनाने केले होते. तरिही विनाकारण बाहेर पडणाऱ्या व्यक्तीसह अन्य कारणांने  नियम तोडणाऱ्या तब्बल ३०हजार ९४० वाहन चालक, मालकांना पोलीसांनी ९७ लाखांचा दंड केला आहे.
दि.१५ एप्रिल ते दि.३१ मे या कालवाधित ३० हजार ९४० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये विना हेल्मेट असलेल्या ८ हजार ४६० जणांना ४२ लाख ३० हजार रु.चा दंड करण्यात आला आहे.चारचाकी वाहनात सिटबेल्ट न लावणाऱ्या २ हजार ३५३ वाहन चालकांना ४ लाख ७० हजार ६०० रु., वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या १०४ वाहन चालकांना २१ हजार रु.दंड, मालवाहतूक करणार्या वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ९ वाहनांना १ हजार ८०० रु. दंड, इंन्शुरन्स नसलेल्या २२६ वाहन चालकांना २ लाख २५ हजार ५०० रु.चा दंड, वाहन परवाना नसलेल्या ८८९ वाहन चालकांना ४ लाख ४४ हजार ५०० रु.चा दंड, १८ वर्षापेक्षा कमी वय असताना वाहन चालविणाऱ्या ४ जणांना २ हजार रु.चा दंड, सक्षम परवाना नसताना अवजड वाहने चालविणार्या २३४ जणांना १ लाख १७ हजार रु.चा दंड, फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या ९७८ जणांना २ लाख १ हजार २०० रु.चा दंड करण्यात आला आहे.
नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्या १२२४ जणांना २ लाख ३८ हजार ८०० रु.चा दंड करण्यात आला आहे. गाड्यांना काळ्या काचा लावणाऱ्या ६०१ जणांना १ लाख २० हजार २०० रु.चा दंड करण्यात आला आहे.यासह पोलीसांच्या नियमांचा भंग करणाऱ्या ९१५ वाहन चालकांना ४ लाख ५७ हजार ५०० रु.चा दंड करण्यात आला आहे. इतर १४ हजार १६९ केसेसमध्ये २९ लाख ८१ हजार ८०० रु.चा दंड करण्यात आला आहे.आता  आजपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी करताना नागरिकांसह वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याचे कटू प्रसंग टाळता येतील असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक शिरिष सासणे यांनी केले आहे.