रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले गणपतीपुळे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने गणपतीपुळे येथील सर्वच लहान मोठे स्थानिक पर्यटन व्यवसायिक, एमटीडीसी व देवस्थान समितीने विविध सेवा सुविधांची तयारी केली असून पर्यटकांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.
शाळा व महाविद्यालयांना दिवाळी सणाची सुट्टी जाहीर झाल्यानंतर अनेक पर्यटकांची पावले आता गणपतीपुळेसह अन्य पर्यटन स्थळांकडे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वळू लागली आहेत. गणपतीपुळेत शनिवारपासून पर्यटकांची रीघ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही दिवाळी पर्यटन हंगामात पर्यटकांची गणपतीपुळेला विशेष पसंती मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन निवास महामंडळाच्या निवासस्थांनामध्ये दहा तारखेपर्यंत आरक्षण बुकिंग झाल्याची माहिती गणपतीपुळे पर्यटन निवासाचे निवासी व्यवस्थापक वैभव पाटील यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी गणपतीपुळे एमटीडीसीलाही पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे परिसरातील सर्व खासगी हॉटेल, लॉजिंग पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, या सर्वांनी जय्यत तयारी केली आहे. व्यावसायिकांनी आपली हॉटेल्स व लॉजिंग चांगल्या प्रकारे रंगरंगोटी केली आहे. येणार्या पर्यटकांना चांगल्या सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यवसायिक सज्ज झाले आहेत.
गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर पर्यटकांना खास आकर्षित करण्यासाठी गणपतीपुळे येथील मोरया वॉटर स्पोर्ट्स संस्थेच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्सच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बनाना राईड, ड्रॅगन राईड, जेसकी बोट, डिस्को राईट आदी वॉटर स्पोर्ट्सचे प्रकार पर्यटकांना खास आकर्षित करत आहेत. गणपतीपुळे किनार्यावर असलेल्या फोटोग्राफी, एटीव्ही बाईक, उंट, घोडा सफर आदी प्रकारांचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे.