Thursday, September 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी दिल्लीत विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर

दिल्लीत विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधासाठी तरुणाई उतरली रस्त्यावर

रत्नागिरीतील मोर्चात हजारो नागरिकांची उपस्थिती

रत्नागिरी:- दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ गुरुवार २३ जुलै रत्नागिरी शहरात हजारो विद्यार्थी, नागरिक, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि नोकरदार वर्ग रस्त्यावर उतरला. मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान हजारो तरुण आणि तरुणी तसेच पालकांनी रस्त्यावर उतरत मोर्चा काढला. या दरम्यान, गगनभेदी घोषणा देत हा विराट निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आणि सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रात्रीच्या अंधारात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंचाच्या पुढाकाराने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या धोरणांविरोधात आणि २३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सकाळी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. सकाळीच वाजताच तरुण, तरुणी आणि पालक मारुती मंदिर या ठिकाणी जमण्यास सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटात हजारो विद्यार्थी आणि पालक मारुती मंदिर येथे जमा झाले. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात झाली. गगनभेदी घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. मारुती मंदिर येथून मोर्चा निघाल्या नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक, नागरिक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
आंदोलनकर्त्यांनी सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणे ही हुकूमशाहीची प्रवृत्ती असल्याची टीका केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मोर्चात सर्व विद्यार्थी संघटना, विविध सामाजिक संघटना, नोकरदार वर्ग तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षभेद आणि मतभेद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले.

दरम्यान, हा मोर्चा सुरू असताना शहरातील वाहतुकीवर काही काळासाठी विपरीत परिणाम झाला. मोर्च्यात नागरिक, विद्यार्थी हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठीच्या मोठी रांग लागली होती. सकाळी भरलेली शाळा सुटण्याची आणि दुपारची शाळा भरण्याची वेळेला हा मोर्चा निघाल्यामुळे अनेक स्कूल बस, व्हॅन, शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, दुचाकीवरून सोडणारे पालक ट्रॅफिकमध्ये अडकून पडले होते. मुख्य रस्त्यावरील झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्गाने शहरातील सन्मित्रनगर येथे वाहतूक सुरू होती; मात्र या रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती; परिणामी एक रुग्णवाहिकेला या वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करणे कठीण झाले. या ऐतिहासिक मोर्चात प्रामुख्याने माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार हुस्नबानू खालीफे, आयोजक अभिजीत हेगशेट्ये, रवींद्र कोकरे, राजेंद्र जाधव, युसूफ आर्ते, शहर प्रमुख प्रमोद शेरे आणि अशोक जाधव यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी अग्रभागी होते. या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला रत्नागिरीकरांचा जाहीर पाठिंबा घोषित करत, शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार करणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी शिव शाहू फुले आंबेडकर विचारमंचच्या वतीने करण्यात आली.