उपचारापूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात निधन
दापोली:- तालुक्यातील नवानगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय वृद्धाने राहत्या घराबाहेरील शेडमध्ये नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानसिंग गणपतराव राजेशिर्के (वय ७९, रा. दापोली नवानगर, ता. दापोली) यांनी आपल्या घराच्या अंगणाकडील बाजूस असलेल्या विहिरीशेजारील पंपाच्या शेडमध्ये नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून घेतला होता. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तातडीने गळ्यातून रस्सी काढून त्यांना घरात घेतले.
वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कुटुंबीयांनी डॉ. सुरज राठोड यांना घरीच बोलावून घेतले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांनी मयताला तातडीने पुढील उपचारासाठी हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेची सोय करून त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ते उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बीएनएसएस १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्र. ७३/२०२६) करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.









