Tuesday, May 19, 2026
spot_img
Home दापोली दापोलीत गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळून गोठा जळून खाक

दापोलीत गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळून गोठा जळून खाक

दापोली:- अवकाळी पावसामुळे दापोली तालुक्यातील दाणादाण उडविली आहे. वाकवली गावामध्ये वीज कोसळून गोठा जळून खाक झाला तर त्यातील जनावरे जखमी झाली आहेत. 1या घटनेत ग्रामस्थ श्री. शरद विठोबा जंगम यांच्या गुरांचा गोठा पूर्णपणे खाक झाला आहे. सुदैवाने, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरांना वाचवण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने दापोली परिसरात हजेरी लावली. याच दरम्यान, वाकवली येथील शरद जंगम यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज कोसळली. गोठा तात्काळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि काही वेळातच पूर्णपणे जळून खाक झाला.

या घटनेमध्ये शरद जंगम यांचे मोठे नुकसान झाले असले तरी, वीज कोसळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन गोठ्यातील गुरांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच गावचे तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.