दापोली:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन छेडले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या महाराष्ट्र कृषी सेवेच्या मुख्य परिक्षा अभ्यासक्रमात कृषी अभियंत्यांवर अन्याय झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. हे राज्यव्यापी आंदोलन असून आंदोलनात लाखो विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले आहेत.
८ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि या दिवशी महाराष्ट्रात महिला विद्याथ्यींनीना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे. ही एक मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे व आम्हाला न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.
कोण म्हणतो देणार नाय,घेतल्याशिवाय राहणार नाय,महाराष्ट्र शासनाचा निषेध असो अशा घोषणांनी कृषी महाविद्यालयीन परिसर विद्यार्थ्यांनी दणाणून सोडला.महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेच्या वतीने हे ठिय्या आंदोलन राज्यभर सुरू आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी घोषित केलेला असंतुलित, अन्यायकारक व तालिबानी नवीन अभ्यासक्रम तात्काळ रद्द करावा,कृषि सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रम तयार करावा व ज्यामध्ये कृषि अभियांत्रिकी व कृषि विद्याशाखेच्या अभ्यासक्रमास समान गुण भारांकन असावे, कृषि अभियांत्रिकी पदवीधरांना कृषि पदवीधराप्रमाणे मुख्य परीक्षेच्या पेपर-१ व पेपर-२ च्या अभ्यासक्रमात व गुण भारांकानाची समान संधी निर्माण करून द्यावी. राज्य लोकसेवा आयोगाच्या इतर पदाच्या मुख्य परीक्षा अभ्यासक्रमाप्रमाणे कृषि सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम पदाशी संबंधीत कर्तव्य व जबाबदाऱ्याशी संबंधित असावा, नवीन संतुलित अभ्यासक्रम निर्माण होईपर्यंत जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा घेण्यात यावी. परंतु नवीन न्यायीक अभ्यासक्रम लवकरात लवकर तयार करण्यात यावा, नवीन कृषि सेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तयार करताना कृषि विभागामार्फत औराबवल्या जाणाऱ्या योजनांचा विचार व्हावा व त्यासंबंधीत अभ्यासक्रम असावा. अशा मागण्यासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे दापोली कृषी महाविद्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे.









