रत्नागिरी:- कोरोनामुळे काही प्रमाणात विस्कळीत झालेल्या सराफी बाजाराला मागणीची झळाळी येऊ लागली आहे. दसर्यानिमित्त सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झाली असून, दसरा आणि दिवाळीपर्यंत त्यात आणखी वाढ होईल, असे सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा भाव 47 हजार 300 रुपये असून, 22 कॅरेटचा भाव 44 हजार रुपये आहे. चांदीचा प्रतिकिलो दर 65 हजार रुपये आहे. गेला काही काळ सराफी बाजारात असलेली मरगळ निघून गेली आहे. मंगळसूत्र, टेम्पल ज्वेलरी, सोनसाखळी खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. मंगळसूत्रातील पेंडंट हिर्याचे बनविण्याकडे देखील कल वाढत आहे. चांदीची देवाची मूर्ती, निरंजन, लक्ष्मीची प्रतिमा यांना चांगली मागणी आहे. उत्सवकाळात भेट देण्यासाठी देखील या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते.
सणासुदीमुळे वाढलेली मागणी आणि भावात झालेली घट यामुळे बाजारात चांगले वातावरण आहे.
नवरात्रीच्या आणि पुढे दसरा-दिवाळीमध्ये बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे आतापासूनच मागणी नोंदविली जाऊ लागली आहे. पारंपरिक दागिन्यांबरोबरच नव्या डिझाईनलाही मागणी वाढत आहे. त्यामुळे सराफांच्या दुकानात मोठी गर्दी होऊ लागली आहे. दिवाळीनंतर येणार्या लग्नसराईपर्यंत तेजी टिकून राहिल, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे.
देवीची मूर्ती, चांदीचे साहित्य अशा साहित्यांना या काळात विशेष मागणी असते. दसर्याला सोन्याच्या मागणीत अधिक वाढ होते. दागिने, आपट्याची सोन्याची पाने या दिवशी खरेदी केली जातात. लग्नसराईसाठी दागिने खरेदी करण्यासाठी देखील या दिवसाची निवड केली जाते. त्या नंतर पुन्हा दिवाळीची खरेदी सुरू होते. सोन्यावर तीन टक्के जीएसटी आहे. मात्र, जीएसटीबाबत झालेल्या जागृतीमुळे या बाबत ग्राहकांची तक्रार नसल्याचेही सराफ व्यावसायिक सांगत आहेत









