रत्नागिरी:-जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ३१ मे पर्यंत पूर्ण करावयाची होती; मात्र अजूनही पोर्टलवरील माहिती भरण्यासंदर्भात शिक्षकांना सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. यंदाच्या बदल्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. आंतरजिल्हा बदल्या केल्यानंतर जिल्हांतर्गतची प्रक्रिया सुरू होईल. जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे अधिक असल्याने आंतरजिल्हा बदल्या होणे शक्य नाही; परंतु उर्वरित महाराष्ट्रातील ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रत्नागिरीतील जिल्हांतर्गत बदल्या होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे.
ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी शासनाने विशेष नियोजन यंदा केले होते. त्यानुसार अवघड, सुगम शाळांची यादीही तयार करण्याच्या सूचना दिल्या. या बदल्यांची प्रक्रिया एका क्लिकवर होणार असल्याने त्यासाठी आवश्यक शिक्षकांची वैयक्तिक माहिती भरण्याचे काम मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर संवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे काम राज्यस्तरावर सुरू होते. ते काम जवळपास अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. तशी माहिती संकलित झाल्यानंतर शिक्षकांना क्रमनिहाय बदली हवी असलेल्या १ ते ३० शाळांची प्राधान्यानुसार यादी ऑनलाइन भरावयाची आहे. ती भरल्यानंतर काही कालावधीत बदल्यांचे आदेश सुटणार आहेत. हे करत असताना सुरवातीला आंतरजिल्हा बदल्या करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया राज्यस्तरावरून होईल. त्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे कोणतेही अधिकार ठेवण्यात आलेले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या १५ टक्केपेक्षा अधिक असल्याने आंतरजिल्हा बदल्या होणार नाहीत. जोपर्यंत राज्यातील अन्य जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत तोपर्यंत जिल्हांतर्गतची प्रक्रिया होणार नाही. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या अशा जिल्ह्यात शिक्षकांना अदलाबदली करणेही अशक्य होईल. त्यामुळे बदल्या लांबल्या तर त्याला प्रचंड विरोध होण्याची शक्यताही आहे.