तालुक्यातील पालीत लॉकडाऊनची घोषणा; शाळा, आठवडा बाजार बंद 

रत्नागिरी:-रत्नागिरी तालुक्यातील पाली गावात कोरोनाचे २ बाधीत रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये २७ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन पाली ग्रामपंचायतीने केले आहे. २ आठवड्यांसाठी आठवडाबाजारही बंद ठेवावा. असेही आवाहन ग्रामपंचायत पाली तर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र दक्षता बाळगली जात आहे. पाली ग्रामपंचायत क्षेत्रातही २ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पाली गा्रमपंचायतीच्या ग्राम कृती दल समितीच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, हायस्कुल, कॉलेज, आयटीआय, प्रायव्हेट क्लासेस २० ते २७ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाली दर बुधवारी आठवडा बाजार भरतो तो पुढील २ आठवडे हा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पाली कार्यक्षेत्रात विनामास्क व्यक्ती आढळल्यास १०० रु. दंड ठोठावण्यात येणार आहे. दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच स्यानिटायझरचा वापर करावा, विनामास्क व्यक्तीस वस्तू देऊ नयेत अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे आवाहन करणारे पत्र पाली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष धाडवे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.