रत्नागिरी:- देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने, रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयातील उंच ध्वजस्तंभाप्रमाणेच जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात 75 फुट उंचीचा ध्वजस्तंभ उभारुन झेंडा फडकवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार असून, प्रत्येक ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्यासाठी सुमारे 25 ते 30 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. स्तंभ उभारणार्या कंपनीकडेच पुढील पाच वर्षात देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही दिली जाणार आहे. याबाबत स्थानिक आमदारांशीही चर्चा करण्यात आल्याचे ना. सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रत्नागिरीत झेंड्याची उंची वाढवली जाणार आहे.
त्याचप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत झालेल्या घडामोडींची माहिती व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यातील पाच हजार विद्यार्थ्यांमार्फत कार्यक्रमही केला जाणार आहे. उमेद अतंर्गत कार्यरत असणार्या बचत गटांच्या अडीअडचणी ना. सामंत यांनी समजून घेतल्या. यावेळी उमेदमध्ये काम करणार्या सीआरपींना मानधन वाढवण्याबाबतच्या मागणीवरही चर्चा करण्यात आली. शिरगाव येथे बचत गटांमध्ये झालेल्या अपहार प्रकरणात पोलीस यंत्रणा योग्य तो तपास करुन कारवाई करेल. यामध्ये कायद्याच्या बाहेर जाऊन कुणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
शासन आपल्या दारी ही योजना जिल्ह्यात कायम स्वरुपी सुरु राहणार आहे. रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या या यशस्वी कार्यक्रमाची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली असून, सिंधुदूर्ग व कोल्हापूर येथे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रत्नागिरीतील पथक मार्गदर्शनासाठी गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अनेक प्रकल्प येण्यास उत्सुक असतात. मात्र त्याला प्रथम विरोध होत असतो, त्यामुळे नागरिकांनीही येणारे प्रकल्प ग्रीन की रेड झोनमधील आहेत, याचीही खात्री करायला हवी असे मत ना. सामंत यांनी व्यक्त केले. रत्नागिरी तालुक्यात मँगो सिटी तर दापोलीत मरिन पार्क उभारण्याच्या दृष्टीने तयारी सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.