दोन दिवसांपासून वातावरण, पुन्हा पालवी येण्याची भीती
रत्नागिरी:- सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरीसह आजुबाजुच्या तालुक्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. या परीस्थितीमुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबून पुन्हा पालवी येण्यास सुरूवात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. थंडीमुळे ३० टक्केहून अधिक झाडांना मोहोर येण्यास आरंभ झालेला आहे. यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच वातावरणातील बदलांमुळे उत्पादनाचा कालावधी लांबलेला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मागील आठवड्यात जिल्ह्यात थंडीचे वातावरण होते. दापोलीत पारा ८ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलेला आहे. त्याचा परीणाम रत्नागिरीकरांच्या आरोग्यावरही जाणवत आहे. सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार बळालेले आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक परीणाम हापूस हंगमावर होणार आहे. पाऊस लांबल्यामुळे हापूसचे उत्पादन एक महिना विलंबाने हाती येणार आहे. त्यामधून आंबा बागायतदार सावरत आहेत. गेल्या महिन्याभरात वातावरण पोषक होते. थंडी सुरू झाल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळालेला होता. झाडांवर मोहोर येण्याची स्थिती पहायला मिळत आहे. सुमारे ३० ते ३५ टक्के ठिकाणी मोहोर येऊ लागलेला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यात उत्पादन हाती येईल अशी आशा बागायतदारांना होती. परंतु गेले दोन दिवस सलग ढगाळ वातावरण असून कधी थंडी तर कधी उष्मा असे बदल होत आहेत. त्यामुळे अनेक झाडांना मोहोराऐवजी पालवी येण्याची शक्यता आहे. तसेच किडींसह तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होऊ शकतो. त्याला सामोरे जाण्यासाठी औषध फवारणीचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे.
आठवडाभरात वातावरण बदलले आहे. त्याचा परीणाम हापूसवर निश्चित होईल. सध्या अनेकठिकाणी मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात खंड पडेल. त्याच जागेवर पालवी आली तर, ती जून होण्यास विलंब लागेल. त्याचा शेवटच्या टप्यातील उत्पादनावर परीणाम होईल.-उमेश रहाटे, आंबा बागायतदार









