राजापूर:- तालुक्यातील सागवे बुरुंबेवाडी येथे डोक्याच्या आजाराला कंटाळून एका ३२ वर्षीय महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर ओढणीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सौ. आरती संदिप गुरव (वय ३२, रा. उपळे गुरववाडी, ता. राजापूर) असे मयत झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत सौ. आरती गुरव यांचा मृतदेह त्यांचा भाऊ तथा खबर देणार ओकार बाळकृष्ण फुटक (वय २६, रा. सागवे बुरुंबेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांच्या घरातील वरच्या मजल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सौ. आरती गुरव यांना बऱ्याच दिवसांपासून डोक्याचा आजार जडला होता आणि याच आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी खबर देणार ओकार बाळकृष्ण फुटक यांनी दिलेल्या खबरीवरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ प्रमाणे राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेची नोंद दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.









