रत्नागिरी:- ठेकेदारांच्या अभावामुळे जिल्ह्यातील जलजीवन योजनेत शंभरहून अधिक गावातील पाणी योजनेच्या निविदा वारंवार प्रसिध्द करुनही प्रतिसाद मिळत नाही. यावर उपाययोजना म्हणून स्थानिक पातळीवरील ठेकेदारांशी संवाद साधून सरपंचांनी कामे घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
जलजीवन मिशनमधील अडचणींवर मात करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता, सरपंच, ग्रामविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. जलजीवनची कामे सुरू करण्यात येणार्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. जीवन मिशन या अभियानातंर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना पुरेसे, दर्जेदार व नियमित पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मार्च २०२४ अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा हर घर नल से जल म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट राज्याने ठेवले आहे. त्यानुसार ही कामे वेगाने पूर्ण व्हावीत अशा शासनाच्या सूचना आहेत. जिल्ह्याचा आराखडा ७०० कोटी रुपयांचा असून सुमारे पंधराहून अधिक पाणी योजनांची कामे आहेत. जिल्ह्यातील शंभर गावातील शेकडो कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. काही निविदा तीन ते चार वेळा प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण त्यांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे ही कामे सुरू करणे अशक्य आहे. यासंदर्भात सरपंचांनी पुढाकार घेऊन गावपातळीवर पाणी योजनेची कामे घेणार्या ठेकेदारांची चर्चा करावी आणि ही कामे करण्याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना सीईओंनी दिल्या आहेत. जिल्ह्यात पाणी योजनेची कामे करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ठेकेदारांची संख्या कमी आहे. जलजीवनमधील कामांची संख्या सुमारे दीड हजाराहून अधिक आहे. त्यातील कामेही दहा लाखाहून पुढे कोट्यवधीच्या दरम्यान आहेत. सध्या निविदा प्रसिद्ध झालेली कामे स्थानिक ठेकेदारांनी घेतली आहेत. काही ठेकेदारांकडे एकापेक्षा अधिक कामे आहेत. त्यामुळे आता प्रसिद्ध होणार्या निविदांना प्रतिसाद मिळत नाहीत. जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे परजिल्ह्यातील ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. याठिकाणी डोंगराळ भाग आणि कातळाची जमीन आहे. ही कामे करण्यासाठी मंजूर निधी कमी पडतो. स्थानिक ठेकेदारच ते करु शकतात. गुहागर आणि राजापूर तालुक्यात सर्वाधिक कामे निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने पूर्ण करता आलेली नाहीत.









