स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठी जबाबदारी
चिपळूण:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विक्रांत भास्करराव जाधव यांची शिवसेना ठाकरे गट उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे. आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव असलेले विक्रांत जाधव यांच्याकडे ही महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. उत्तर रत्नागिरीच्या जिल्हाप्रमुख पदी एका युवा नेत्याला काम करण्याची संधी देऊन पक्ष नेतृत्वाने युवकांचा सन्मान केला असल्याचे बोलले जात आहे.
या निवडीचे सर्वात मोठे महत्त्व हे आहे की, लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद व पंचायत समिती) निवडणुकांच्या तोंडावर त्यांना हे महत्त्वाचे पद मिळाले आहे. त्यामुळे पक्षाला संघटनात्मक पातळीवर मजबूत करण्याची मोठी जबाबदारी विक्रांत जाधव यांच्यावर येऊन पडली आहे.
विक्रांत जाधव यांच्या या निवडीमुळे उत्तर रत्नागिरीतील शिवसैनिक, विशेषतः युवा वर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेला कामचा अनुभव आणि युवकांचे नेतृत्व करण्याची क्षमता पाहता ही निवड स्थानिक राजकारणासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.