दापोली करंजाळी चिरेखाण येथील घटना
दापोली:- करंजाळी चिरेखाण परिसरात चिरे वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरमुळे झालेल्या अपघातात एक मजूर ठार झाला. हा अपघात १५ नोव्हेंबरला झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश कमला बनवासी (वय ३६) हा ट्रॅक्टरने चिरे भरून करंजाळी येथील कच्च्या रस्त्याने जात होता. ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवल्याने शेजारी बसलेला कन्हैय्या लकडू बनवासी (वय ३५, रा. थाना मुगरा बासापुर, ता. मछलीशहर, जि. जौनपूर (उत्तर प्रदेश) याचा तोल गेला आणि तो ट्रॅक्टरमधून खाली पडला. त्यानंतर ट्रॉलीचे चाक शरीरावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर सहकाऱ्यांनी मदतीने जखमीला हलविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मयताचा नातेवाईक रामबहादुर नंदलाल बनवासी (वय २२, रा. थाना सरायमरेज, उत्तरप्रदेश) यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून चालक राजेश कमला बनवासी याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









