आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी:- आषाढी एकादशीनिमित्त ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या अखंड जयघोषाने रत्नागिरी नगरी आज दुमदुमून गेली. शक्ती पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरापर्यंत निघालेल्या पारंपरिक दिंडीने भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. बालगोपाल, महिला आणि वारकरी भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहर विठ्ठलमय झाले असून टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताकांची उधळण आणि हरिनामाच्या गजराने भक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवायला मिळाला.
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील प्रसिद्ध बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
या पावन प्रसंगी मंदिरातील मुख्य महापूजेचा मान जितेंद्र जोशी व सौ. राधिका जोशी या दाम्पत्याला मिळाला. भाविकांच्या उपस्थितीत आणि विठूरायाच्या गजरात त्यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची यथोचित सांगोपांग पूजा व आरती संपन्न केली.
आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासूनच विठ्ठलमंदिरात भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. टाळ-मृदुंगाचा गजर आणि ‘ज्ञानबा तुकाराम’च्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन कृतार्थता व्यक्त केली.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा संगम घडविणाऱ्या भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण रत्नागिरी नगरी विठ्ठलमय झाली होती. बालगोपालांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या दिंडी सोहळ्याला विशेष शोभा प्राप्त झाली.
शक्ती पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून दिंडीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. यानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताका फडकवत आणि हरिनामाचा गजर करत दिंडीने प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान केले.
दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा पारंपरिक वेशभूषेतील सहभाग हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. महिला नऊवारी साड्या, पारंपरिक दागिने आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या. पुरुष भाविकांनी पांढरा कुर्ता, धोतर आणि वारकरी फेटा परिधान करत टाळांच्या गजरात विठ्ठलनामाचा अखंड जप केला. बालगोपालांनीही पारंपरिक वेशभूषा साकारत विठुरायाच्या भक्तीत रंग भरला. लहान मुलांच्या उत्स्फूर्त सहभागाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
दिंडी मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी वारकऱ्यांचे स्वागत करून विठ्ठलनामाचा जयघोष केला. फुलांनी सजविलेली पालखी, भगव्या ध्वजांची मनमोहक उधळण, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिपाठाच्या सुरांनी रत्नागिरीच्या वातावरणाला पंढरपूरच्या वारीची अनुभूती दिली.
शतकानुशतके चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे जतन करत स्थानिक पातळीवर पायी दिंडी काढून विठुरायाची सेवा करण्याचा संस्कार रत्नागिरीकरांनी यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने जोपासला. सामाजिक ऐक्य, अध्यात्म आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या या दिंडी सोहळ्याने रत्नागिरीकरांच्या मनात भक्तीचा दीप अधिक प्रज्वलित केला. विठ्ठल मंदिरात दिंडीचे आगमन झाल्यानंतर महापूजा, आरती, हरिनाम संकीर्तन आणि महाप्रसाद वितरणाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली.









