जिल्ह्यातील ५६ गावांची लवकरच ‘हर घर जल’ म्हणून घोषणा

रत्नागिरी:- जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १ हजार ३५२ पैकी १ हजार २९२ कामांना वर्कऑर्डर दिली असून ५६ गावे हर घर जल म्हणून घोषीत करण्याच्या टप्प्यावर आहेत. जिल्ह्याचा आराखडा ९१२ कोटीचा असून २०२२-२३ मध्ये प्राप्त ६२.७२ कोटीपैकी ५२.१२ कोटी खर्च झाले आहेत.

जल जीवन मिशनअंतर्गत मार्च २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नियमित आणि दीर्घकालीन पुरेशा दाबाने शुद्ध पाणी दिले जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक कृती आराखडा २०२२-२३ जिल्हास्तरावर तयार करण्यात आला आहे. यामध्ये गावांची संख्या १४७५ असुन नवीन योजनांची संख्या ५५४ आणि दुरुस्ती योजनांची संख्या ९२१ आहे. या आराखड्यामधील नुतन सर्वेक्षणानुसार मागणी नसलेली आणि जीवन प्राधीकरण विभागाकडे वर्ग केल्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून १ हजार ३५२ योजनांना मंजूरी मिळाली आहे. यासाठी ९१२ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. आतापर्यंत १ हजार ३५२ योजनांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातील १ हजार ३५२ योजनांना तांत्रिक मंजूरी दिली गेली आहे. आतापर्यंत १ हजार ३२४ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निवीदा जाहिर झाल्या आहेत. जिल्हयातील ५६ गावे ’हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. जिल्हयात घराघरात नळ जोडणीचे उद्दीष्ट ४ लाख ४४ हजार ९६६ पैकी २ लाख ८६ हजार ९०१ जोडण्या देण्यात आल्या आहेत. योजना राबवताना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार हे सातत्याने आढावा घेत आहेत.