रत्नागिरी:- जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४३२ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ४०० योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४४५ योजनांचे सुधारित अंदाजपत्रक तयार करावे लागणार आहे. तर ५८७ योजनांचे काम अंतिम टप्प्यात आहेत. जिल्ह्याचा आराखडा ता ११०० कोटी रुपयांचा होता. आता त्यामध्ये मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमानशी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.
या योजनेच्या माध्यमातून ९ तालुक्यांमध्ये १ हजार ४३२ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ४०० योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची अवस्था संस्थेमार्फत तपासणी करून, योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत.
जिल्ह्यात १ हजार ४३२ पैकी ४४५ योजनांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व योजनांचे सुधारीत अंदाजपत्रक तयार करावे लागणार आहे, ही प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्याचा १ हजार १०० कोटीचा आराखडा होता, त्यामध्ये आता सुधारित अंदाजपत्रकामुळे वाढ होणार आहे. साधारण सप्टेंबर २०२४ पर्यंत या सर्व योजना पूर्ण करण्याचा मानस जि. प. चा आहे. तसे आदेशही संबंधित ग्रामपंचायत व ठेकेदारांना देण्यात आले आहेत. ठेकेदारांनी विलंब लावला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सध्या दोन ठेकेदारांवर निकृष्ट दर्जाचे काम व विलंब केल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पूजार यांनी दिली. आत्तापर्यंत ११० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ८० टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
एका तासात होणार तक्रार निवारण
जलजीवन मिशनसंदर्भात अनेक तक्रारी जि. प. कडे दाखल होत आहेत, विलंब काम, निकृष्ट दर्जाचे काम आदी तक्रारींचा समावेश आहे. जि. प. ने चा संदर्भात कडक भूमिका घेत टोल फ्री नंबर जाहीर केला आहे. (०२३५२) ३५०७२७ या नंबरवर तक्रार केली, तर एका तासात तक्रारीचे निवारण करण्यात येते. यामुळे या टोल फ्री नंबरवर नागरिकांची तक्रार असल्यास संपर्क साधावा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पूजार यांनी केले आहे.









