जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आजपासून रणसंग्राम

रत्नागिरी:- ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींचा निवडणूक होणार असून सोमवारपासून (ता. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आरंभ होत आहे. या निवडणुकीत रत्नागिरी आणि खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून किती उमेदवार उभे करण्यात येणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी तर शिंदेंच्या पक्षाशी भाजपची युती झालेली नसल्याने पुढील चार दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वतुळ ढवळून निघाले होते. निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरु होते. काही ठिकाणी बिनविरोध जागाही करण्याचा स्थानिक पातळीवर निर्णय झाला आहे; मात्र बाळसाहेबांची शिवसेना आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन पक्षांकडून ही निवडणुक प्रतिष्ठेची बनविण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत सर्वांनाच उत्सुकता लागुन राहील नाही. निवडणुक विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मंडणगड १४, दापोली ३०, खेड १०, चिपळूण ३१, गुहागर २०, संगमेश्वर ३५, रत्नागिरी २८, लांजा १८ आणि राजापूरमधील ३० ग्रामपंचायतीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून आरंभ होणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष मंडणगड-खेड-दापोली आणि रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघावर राहणार आहे. या मतदार संघातील दोन्ही आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेचे म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत.  नुकत्याच झालेल्या रत्नागिरीतील चार ग्रा.पं. निवडणुकीत शिंदे गटाला ठाकरे गटाने शह दिला होता. त्यामुळे या निवडणुकांकडे सर्वांचे विशेष लक्ष असेल. ग्रामीण भागातील मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतो हे पाहायला मिळणार आहे. दोन्ही विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींचा आकडा अधिक असल्याने ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची सत्वपरीक्षा ठरणार आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे मंत्रिमंडळात उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघाबरोबरच आजूबाजूच्या मतदारसंघातही ग्रामपंचायतींवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.